सोमवार, २० जून, २०११

चिऊ

"चिऊ"
-नवज्योत चंद्रशेखर वेल्हाळ


बी. एस्. सी. चा रिझल्ट नुकताच लागला होता... आमच्या ग्रुपमधील मी, अभि, सुहास, स्वप्निल आणि सुदीप.. आम्ही पाचही जण पास झालो होतो... रिझल्ट लागल्यावर तो आणायला कॉलेजला एकत्रच जायचं असं सगळ्यांनी एकमेकांना फोन करून सांगितलं...
चार दिवसांनी आम्ही सगळे बरोबर ११ वाजता कॉलेजात पोचलो... रिझल्ट घेतले... एकमेकांचं अभिनंदन केलं... कॅंटीनमध्ये मस्तपैकी चहा-नाश्ता केला... आणि तो आटोपुन सगळे अभिजीतच्या घरी दाखल झालो...
आज ठरवायचं होतं... पुढे काय करायचं... शिकायचं कि नोकरी करायची... कि नोकरी करता करता शिकायचं... बोलायला सुरुवात मीच केली...
"मला पुढे शिकायचंय... पण यापुढे स्वतः कमवून शिकायचंय... त्यामुळे मी नोकरी करणार हे निश्चित... फक्त कुठे ते ठरवायचंय..."
"माझा पण तोच विचार आहे..." -स्वप्निल.
"मला तर पुढे शिकायचंच नाही... आईशपथ..!" शिक्षणाला कंटाळलेला अभि अतिशय त्रासिक सुरात बोलला...
"मला शिकायचंय... पण नोकरी करून..." -सुहास.
"मला पण नोकरी करूनच शिकायचंय..." -सुदीप.
सगळ्यांना नोकरी करूनच शिकायचं होतं... फक्त नोकरीचं ठिकाण ठरवायचं होतं...
"मी काय म्हणतो..." थोडासा पॉज घेऊन मी सुरूवात केली... "आपल्याला सगळ्यांनाच नोकरी करून शिकायचंय... मग आपण कुठेतरी.. पुण्या-मुंबईत खोली घेऊन रहिलो आणि नोकरी शोधली तर..."
"कल्पना छान आहे..."-अभि.
आज प्रथमच अभिला चक्क माझं म्हणणं पटत होतं...
"पण कुठे ? पुणे कि मुंबई ?" -सुदीप.
"गोवा" -अचानक सुहासने कोणाच्याही ध्यानी मनी नसलेलं नाव घेतलं...
"गोवा ?"
"हो"
"पण तिथे कसली नोकरी ?" -मी.
"अरे, तिथे एक नवीन कंपनी सुरू झाली आहे - HUTECH Pvt. Ltd. नावाची... IT कंपनीच आहे... मडगांवला... तिथे सध्या Vacancies आहेत... आपल्याला तिथे नोकरी मिळू शकते... सुरूवातीला साधारण ८००० पगार मिळेल... पुढे आपल्या Performance वर सगळं अवलंबून आहे... Permanent होण्याचेही chances आहेत... असं माझा फोंड्याचा मामा सांगत होता... बोला काय म्हणताय...?" -सुहासने सगळं एकाच श्वासात सांगून आमचं मत विचारलं...
कल्पना खरंच छान होती...
"मला चालेल" -मी.
माझ्या पाठोपाठ सगळ्यांनीच होकार दिला...
"पण राहायचं कुठे ?" -सुदीपने सगळ्यांच्याच मनातला प्रश्न विचारला...
"मामाचं मडगांवला एक छोटसं घर आहे... सध्या बंदच आहे... आपण पाच जण तिथे आरामात राहू शकतो..." -सुहासने राहण्याचा खुपच मोठा प्रश्न सोडवला होता...
"आज १० तारीख आहे... २५ जूनपासून Interview ला सुरूवात होणार आहे... लवकरात लवकर काय ते ठरवा आणि मला सांगा... म्हणजे तसं मी मामाला कळवतो..." -सुहास.
"ठीक आहे..." असं म्हणून सगळे उठलो... अभिजीतकडून काही नवीन चित्रपटांच्या सीडीज घेऊन आम्ही निघालो...
घरी गेल्यावर आई-बाबांच्या कानी ही गोष्ट घातली... त्यांना सगळं समजावून सांगितलं... त्यांनीही जास्त चौकशी न करता किंवा आढेवेढे न घेता परवानगी दिली...
इतर सगळ्यांनीही आपापल्या घरच्यांची परवानगी मिळवली... आणि... २१ जूनला मडगांवला जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सामानानिशी आम्ही सर्व चिपळूण स्टेशनला एकत्र जमलो... अभिजीतने आदल्याच दिवशी सर्वांची मडगांव एक्सप्रेसची तिकीटं काढून ठेवली होती... १२.३० वाजता ट्रेन आली... रिमझीम पाऊसही पडत होता... भिजतभिजतच ट्रेनमध्ये चढलो... आज आमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाची आणि महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात होत होती...
...आणि नेहमीप्रमाणेच या ही वेळी माझ्या आयुष्यातल्या ह्या महत्त्वाच्या क्षणाचा 'पाऊस' साक्षीदार होता...
...ट्रेन सुरू झाली... ट्रेनला तशी गर्दी फारशी नव्हती... सगळ्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळाली... मी सामान ठेवलं... आणि दरवाज्याजवळ येऊन उभा राहिलो... पावसामुळे हवेत चांगलाच गारवा होता... गार वारा अंगावर शहारे आणत होता... पावसाचे बारीक थेंब चेह-यावर घेत... बाहेरच्या पावसाकडे वेगळ्याच नजरेने पाहत होतो... मनाचा निर्धार करून, उराशी बाळगलेली काही स्वप्नं घेऊन आज घरातून बाहेर पडत होतो...आजपर्यंत आईवडलांनी शिकवलं... आता स्वत: कमवून शिकायचं होतं... तसं ठरवलंच होतं... काहीही करून नोकरी मिळवायचीच होती... मनाशी काही योजना आखल्या होत्या... त्या पुर्णत्वास न्यायच्या होत्या... सावधपणे, तोल सावरत हात दरवाज्यातून बाहेर काढले... पावसाचे चार थेंब ओंजळीत झेलून चेह-यावरून हलकेच ओंजळ फिरवली... बरं वाटलं...
...गप्पा गोष्टी करत-करतच आम्ही रात्री ८ वाजता मडगांवला पोचलो... सुहासचा मामा आम्हाला न्यायला स्टेशनवर आला होता... त्या रात्री मामांकडेच-फोंड्याला वसती केली.. मस्तपैकी गरमागरम चिकन-तंदूरीचा आस्वाद घेतला... सुहासचे मामा स्वभावाला खूपच चांगले आणि मनमोकळे होते... उद्या मडगांवच्या 'त्या' घरी जायचं ठरवून आम्ही झोपी गेलो...
...दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून, सर्व आटोपुन मामासोबत आम्ही मडगांवला पोचलो...मामांनी माणसं बोलावून आधीच ते घर साफ करून घेतलं होतं...
...आमच्या जेवणाची सोय बाजूच्याच खाणावळीत केली होती... आम्हाला तिथे सोडून मामा परतले... आम्ही सामान ठेवलं आणि परिसर फिरून बघावा म्हणून बाहेर पडलो... तो परिसर खरंच खूप छान होता... पावसाळा असूनसुद्धा आजूबाजूला कुठेच विशेष घाण नव्हती... सगळीकडे हिरवळ होती...आजूबाजूला मोजक्याच पण सुंदर सुंदर इमारती-बंगले होते... माडांची झाडं, पोफळीच्या बागा... एकूणच कोकणी सौंदर्य तिथे अगदी ठासून भरलं होतं... इतक्यात... एका इमारतीने माझं लक्ष वेधून घेतलं...
...अतिशय सुंदर रंगसंगती असलेली ती इमारत होती -- 'मातृछाया-अनाथाश्रम'... का कुणास ठावूक, पण ती इमारत बघून मनात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं... एक कुतुहल जागं झालं... इमारत आणि आमचं घर यांच्यामध्ये फक्त एक छोटासा बांध होता... आणि त्याला गेटही होता... इमारतीचं निरीक्षण करता करता अचानक पावसाला सुरूवात झाली आणि आम्ही घरात परतलो... पुढचे तीन दिवस असेच इकडे-तिकडे फिरण्यात आणि परिसराची माहिती करून घेण्यात घालवले...
... २५ तारखेला सकाळी लवकर तयार होऊन आम्ही आमच्या महत्त्वाच्या कगदपत्रांसोबत HUTECH कंपनीत पोचलो... Interview ला सुरूवात झाली होती... एक-एक उमेदवार मुलाखत देऊन बाहेर पडत होता... कोणी चिंतातूर तर कोणी आनंदी चेह-याने...
... शेवटी आमची वेळ आली... आधी सुहास, मग मी, स्वप्निल, सुदीप, आणि अभि असे पाचही जण Interview देऊन आलो... Interview चांगला झाला... आणि विशेष म्हणजे आम्ही पाचही जण निवडले गेलो... फ्क्त आमची नियुक्ती वेगवेगळ्या सेक्शन्सवर झाली इतकंच...
...आनंदाच्या भरातच घरी आलो... रात्री मस्तपैकी पत्ते खेळलो... १ जुलैपासून नोकरीवर रूजू व्हायचं होतं... या आनंदातच पुढची स्वप्नं रंगवत झोपी गेलो...
...सकाळी मी लवकर उठलो... आकाश आज निरभ्र होतं... सर्व प्रात:विधी आटोपून कालच्या त्या अनाथाश्रमाच्या गेटजवळ आलो... आत पाहिलं... २०-२५ छोटी मुलं तिथे चेंडूने खेळत होती... त्यांचं ते खेळणं बघून, सकाळच्या कोवळ्या उन्हात, ओल्या हिरवळीवर सुंदर नाजूक फुलपाखरं बागडत असल्याचा भास होत होता... इतक्यात त्यांच्यापैकी कोणीतरी चेंडू भिरकावला... आणि तो नेमका माझ्या पायाजवळ येऊन पडला... मी चेंडू उचलला आणि तो घेऊन गेटमधून आत शिरलो... इतक्यात एक छोटी मुलगी - साधारण साडेतीन-चार वर्षांची असेल - माझ्याजवळ आली आणि म्हणाली -
"दादा, बॉल दे ना रे..."
लहान असूनही तिचे उच्चार स्पष्ट होते... गौरवर्ण, नाजूक ओठ, पाणीदार आणि मोहक डोळे, गुबगुबीत गाल, पांढराशुभ्र फ्रॉक, गोड हास्य आणि हसताना गालावर पडणा-या गोड खळ्या... त्या ओल्या हिरवळीवर आणि सोनेरी उन्हाच्या पार्श्वभूमीवर ती मला एखाद्या छोट्याश्या सोनपरीसारखी भासत होती... मी खाली वाकलो... बॉल पुढे केला...
"हा घे, तुझा बॉल..."
तिने हात पुढे केला... पण मी हात मागे घेत म्हटलं...
"आधी तुझं नाव सांग..."
"चिन्मई..."
"असं नाही... पुर्ण नाव सांग..."
"पुर्ण नाव...?"
तिने भाबड्या नजरेने माझ्याकडे पाहत विचारलं आणि... मी चपापलो... अनाथाश्रमातल्या मुलीला पुर्ण नाव कसं असेल...? स्वत:ला सावरत तिला विचारलं...
"बर, जाऊदे... मी येऊ तुमच्यात खेळायला...?"
"नाही..."
"का...?"
"तु तुझं नाव नाही सांगितलंस..."
"माझं नाव... नवज्योत... आता तरी येऊ का तुमच्यात खेळायला...?"
"आमच्या काकूंना विचार..."
"कुठायत तुमच्या काकू...?"
"त्या काय... तिथे बसल्यात..." थोड्या अंतरावर पटांगणात खुर्ची टाकून बसलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवत चिन्मई म्हणाली... चिन्मई..?... नाही...'चिऊ'... मला पटकन हे टोपणनाव सुचलं होतं...
"ए, मी तुला चिऊ म्हणू...?"
"चिऊ...?"
"हो..."
"चालेल..." ती गोड हसत म्हणाली आणि माझ्या हातातला बॉल हिसकावून उड्या मारत खेळायला निघून गेली... मी त्या काकूंकडे गेलो... त्या पेपर वाचत बसल्या होत्या... सधारण ५०-५५ वय असेल... पण चेह-यावर विलक्षण तजेला होता... चेह-यावरूनच त्या फार बुद्धिमान वाटत होत्या....
"नमस्कार..." -मी हलकेच म्हटलं...
"नमस्कार, कोण आपण ?" च्ष्म्याच्या काचांमधून नजर रोखत त्यांनी मला विचारलं... मी माझी आणि माझ्या मित्रांची माहिती सांगितली...मग चिऊचा आणि चेंडूचा किस्साही सांगितला...
"माझ्याकडे काही काम होतं का ?"
"नाही..."
"मग...?"
"काही नाही, ह्या मुलांना इथे खेळताना पाहिलं आणि त्यांच्याबद्द्ल कुतुहल वाटलं म्हणून आलो..."
"अनाथ मुलांबद्द्ल कसलं कुतुहल...?"
"खरं म्हणजे... मॅडम..."
"मला काकू म्हटलंस तर जास्त आवडेल..." त्या हसतहसतच म्हणाल्या... माझ्यासाठी खुर्ची मागवून बसायला सांगितलं..
"बस..."
"हो..."
"हं... बोल आता..."
"खरं म्हणजे काकू... मला अशा मुलांबद्दल नेहमीच सहानुभुती वाटते... त्यांच्यासाठी नेहमीच काहीतरी करावसं वाटतं... "
"काय करू शकतोस तू...?" माझं बोलणं मध्येच तोडत काकूंनी विचारलं...
"काकू, मला वाटतं... दु:खाने भरलेल्या आयुष्यात आनंदाचं कमळ फुलवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे 'हसणं'... मी ह्या मुलांना खूप हसवू शकतो..."
"कसं काय...?"
"ते मी करूनच दाखवेन... फक्त मला काही दिवस द्या... पण त्याआधी मला तुमच्याबद्दल आणि ह्या आश्रमाबद्दल थोडं सांगा ना...!"
"ठीक आहे,... हा आश्रम माझ्या वडीलांनी बांधला... आता त्यांच्या मृत्युनंतर इथलं सगळं मीच पाहते... माझे पती मला यात मदत करतात..."
काकूंनी आश्रमाबद्दल सगळी माहिती सांगितली... सांगताना त्या अगदी भारावून गेल्या होत्या...
मी त्यांना चिऊबद्दल विचारलं... तशा त्या थोड्या गंभीर झाल्या...
"साधारण साडेतीन वर्षांपुर्वी चिन्मई आम्हांला रस्त्याकडेच्या कचरापेटीत सापडली होती... त्यावेळी पाऊसही पडत होता...महापालिकेचा एक कर्मचारी कचरापेटी साफ करत असताना त्याला एका पांढ-या फडक्यात गुंडाळलेली-नुकतीच जन्मलेली चिन्मई सापडली... त्याने तिला आमच्या ताब्यात दिलं... तिला ताप भरला होता... आम्ही त्वरीत डॉक्टरोपचार करून तिला वाचवलं होतं...तिचं नाव ठेवलं...चिन्मई... चिन्मई खुपच गोड व हुशार मुलगी आहे... दरवर्षी १२ जुलैला आम्ही चिन्मईचा वाढदिवस साजरा करतो... कारण त्याच दिवशी ती आम्हाला मिळाली होती... "
खरंच... काकू ज्या पद्धतीने हे सगळं सांगत होत्या ते ऐकून विषाद वाटत होता... चिऊप्रमाणेच इतरही मुलांच्या मागे थोड्या-फार फरकाने असाच इतिहास होता...
"बर, तु बोल, तु ह्या मुलांसाठी काहितरी करणार होतास ना..."
"हो, येत्या १२ जुलैला... चिऊच्या वाढदिवशी..." मी मनाशी काहितरी ठरवत म्हणालो...
"काकू, मला तुमचा आश्रम दाखवाल...?"
"हो, चल दाखवते..."
मग काकूंबरोबर जवळजवळ अर्धा-पाऊण तास मी तो अनाथाश्रम पाहण्यात घालवला... प्रत्येकी चार मुलांसाठी एक खोली याप्रमाणे खोल्या होत्या... प्रत्येक खोलीत प्रत्येक मुलासाठी एक कपाट होतं... त्यात त्यांचे कपडे, अभ्यास वगैरेचं सामान होतं... प्रत्येकाला अभ्यासासाठी टेबल होता... काकूंनी मला चिऊची खोली दाखवली... रंगबेरंगी चित्रं, कागदी फुलांची तोरणं, इत्यादींनी चिऊने ती खोली अगदी तिच्या मनाप्रमाणे सजवली होती... बघता बघता दुपार झाली...मला जेवायला जायचं होतं... काकूंचा निरोप घेऊन मी निघालो...

त्या रात्री अंथरूणावर पडलो तरी खूप वेळ झोप येत नव्हती... डोळ्यांसमोर सारखा तो आश्रम आणि चिऊ येत होती...
दुस-या दिवशी सर्व मित्रांना मी त्या अनाथाश्रमाबद्दल सांगितलं... आणि त्या मुलांची हसवणूक करण्यासाठी काय करायचं ह्याची योजनाही ऐकवली...
१ तारखेपासून आमची नियमित नोकरी चालू झाली... संध्याकाळी घरी आल्यावर आम्ही त्या कार्यक्रमाची तालीम करत असू... असं करता-करता १२ जुलैचा दिवस उज़ाडला...संध्याकाळी आश्रमात चिऊचा वाढदिवस साजरा होणार होता... तिथल्या कर्मचा-यांनी आणि मुलांनी आश्रमाचा हॉल फुलांनी, तोरणांनी आणि फुग्यांनी छान सजवला होता... आम्हीही सर्व आमच्या काही सामानानिशी संध्याकाळी आश्रमात पोचलो... काकूंना भेटून माझ्या सर्व मित्रांची ओळख करून दिली... आणि एका खोलीत जाऊन तयरी करू लागलो... मी विदुषकाचा वेष परिधान केला होता... चेहरा विदुषकाप्रमाणे रंगवला होता... बाकिच्यांनीही मिकी माऊस, टॉम, जेरी अशी गंमतीशीर रूपं घेतली होती... आश्रमातले सर्व वाढदिवसासाठी हॉलमध्ये जमले होते...समोर केक ठेवला होता... सगळ्यांना प्रतिक्षा होती ती चिऊच्या येण्याची... आणि चिऊ आली... चिऊने छान मोती कलरचा रेशमी झालर असलेला फ्रॉक घातला होता... नाजूक ओठांवर हलकिशी लिपस्टीक लावली होती... कानात झुंबर आणि हातात पांढरेशुभ्र ग्लोव्ह्ज घातलेली चिऊ फारच गोड दिसत होती.. जाऊन तिचा एक गोड पापा घ्यावा असं वाटत होतं... चिऊ केकजवळ आली... तिने मेणबत्या फुंकल्या आणि सर्वांनी "हॅपी बर्थडे चिन्मई" असा एकच जल्लोष केला... फुगे फुटले...त्यातले थर्माकॉलचे छोटे मणी सर्वत्र पसरले आणि हे सर्व सुरू असताना आम्ही आमच्या गंमतीशीर रूपात धावत तिथे पोचलो... ठरल्याप्रमाणे तारे जमीं पर मधलं 'बंबं बोले' गाणं सुरू झालं... आणि आम्ही चित्रविचित्र हावभाव करीत उड्या मारायला लागलो... सगळेजण आमच्याकडे बघून खळखळून हसत होते...जेरी उंदराचं रूप धारण केलेला अभि टीवल्याबावल्या करण्यात आघाडीवर होता... स्वप्निलने काही कसरती करून दाखवल्या... आमच्या ह्या सगळ्या धांगड-धिंग्याला सर्व मुलं खो-खो हसून आणि टाळ्या वाजवून अगदी मनापासून प्रतिसाद देत होती...
...गाणं थांबलं आणि आम्हीही थांबलो... उड्या मारून आम्ही आणि हसून खिदळून सर्व मुलंही दमली होती... आश्रमातल्या एका कर्मचा-याने सर्वांना केक आणि चिवडा आणला... त्यानंतर रसनाचीही सोय होती...
...आज खरंच खूप बरं वाटत होतं... या लहान मुलांना हसवून एक आत्मिक समाधान मिळालं होतं... काकूंना दिलेला शब्द मी खरा करून दाखवला होता... सगळी मुलं आमच्याभोवती गोळा झाली होती... आम्ही सर्वांना आम्ही आणलेली चॉकलेट्स वाटली... चिऊसोबत सर्वांनी फोटो काढून घेतले... सर्व मुलांनी वेगवेगळ्या रूपातल्या आमच्यासोबत आवडीने फोटो काढून घेतले... त्या क्षणी एक विचार मनात येऊन गेला... "आयुष्यात एकदा तरी जोकर होऊन बघावं...!"
...इतक्यात काकू आमच्याजवळ आल्या... त्यांनी आमचं कौतुक केलं...
"शाब्बास मुलांनो ! जे बोललात ते खरं करून दाखवलंत... आज खूप दिवसांनी ही मुलं इतकी मनसोक्त हसली..."
"बरंय काकू, आम्ही निघतो..."
"अरे, कुठे जाताय? आज तुम्ही सर्वांनी आमच्यासोबतच जेवायचंय..."
काकूंनी आग्रह करून आम्हाला जेवायला थांबवलं... त्या दिवशी अगदी मनसोक्त जेवलो... त्या सर्व मुलांसोबत ती संध्याकाळ खरंच खूप छान गेली... अगदी अविस्मरणीय अशीच संध्याकाळ होती ती...
...काही दिवसांनी एका रविवारी काकूंचा मला फोन आला...
"हॅलो..."
"हॅलो, नवज्योत..."
"हां, बोला काकू, कशा आहात...?"
"मी ठीक आहे रे... तुम्ही सगळे कसे आहात ? खुप दिवसांत इकडे आला नाहीत..."
"हो, काकू, गेले काही दिवस आम्ही सगळेच Overtime करत होतो... त्यामुळे शक्य झालं नाही..."
"बर, असुदे, आज रविवार आहे, तुमचं काही प्लॅनिंग आहे का ?"
"नाही, काही विशेष नाही, का ?"
"नाही ना, मग आज संध्याकाळी तुम्ही सगळे आमच्याबरोबर आगवाद बीचवर येणार आहात... संध्याकाळी ५ वाजता तयार राहा..."
"बर, ठीक आहे..."
"अच्छा !"
"अच्छा !"
...काकूंनी फोन ठेवला आणि मी डाराडूर झोपलेल्या अभि, सुहास, स्वप्निल आणि सुदीपला उठवलं... सगळेजण डोळे चोळत आणि मला शिव्या घालत उठून बसले... पण त्यांच्या शिव्यांकडे लक्ष न देता मी त्यांना संध्याकाळच्या प्लॅनिंगबद्दल सांगितलं... सर्वांनी होकार दिला...
...ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता आश्रमाच्या गाडीत बसून आम्ही आगवाद बीचवर निघालो... गाडीत मुलांनी एकच गोंधळ घातला होता... चिऊ तर अगदी आनंदाने उड्याच मारत होती... गाडीत मुलांनी शाळेत शिकवलेली छान छान गाणी म्हटली... चिऊने काही मराठी आणि संस्कृत श्लोक म्हटले... तिचे इतक्या लहान वयात इतके स्पष्ट संस्कृत उच्चार ऐकून आम्ही सगळेच अवाक झालो... आणि तिचं कौतुकही वाटलं... काही वेळातच आम्ही आगवाद बीचवर पोचलो... मुलं धावतच बीचवर पळाली... आणि त्यांच्या मागून आम्ही... सर्वजण वाळूत आणि समुद्राच्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत होते, खेळत होते... माझे सवंगडीपण त्यांच्यात रमून गेले होते... चिऊ मात्र एका बाजूला शांतपणे वाळूत घर बांधायचा प्रयत्न करत होती... मी तिच्याजवळ गेलो आणि घर बांधण्यात तिला मदत करू लागलो... घर बांधता बांधता चिऊ म्हणाली,
"दादा, मी ना... त्या चिऊताईच्या बाळासाठीसुद्धा असंच पुठ्ठ्याचं आणि मऊ मऊ कापसाचं घर बनवणार आहे... म्हणजे मग त्या बाळाला थंडी लागणार नाही...!"
"चिऊताई...? कुठली चिऊताई...? आणि कुठलं बाळ...?"
"ती एक गंमत आहे... तुला नंतर दाखवेन..."
"बर, ठीक आहे..."
मला तिच्या समजुतदारपणाचं खूप कौतुक वाटलं... तिच्या निरागसपणाचं कौतुक वाटलं... हेवाही वाटला... आणि क्षणभर वाटून गेलं... आपण उगाचच मोठे झालो...
चिऊ घर बांधण्यात मग्न होती... मी तिच्याकडे नुसता पाहत होतो... तिच्या नकळत तिचा एक फोटोही काढून घेतला... थोड्या वेळाने चिऊचं घर बांधून पूर्ण झालं...
"दादा, घर कसं आहे रे...?"
"खूपच सुंदर... तुझ्यासारखं..."
चिऊ गोड हसली... आणि तिचं ते हास्य मी माझ्या कॅमे-यात कैद करून घेतलं...
----------------------------------------------
...असेच दिवस जात होते... आश्रमात आमचं नेहमीचं येणं-जाणं सुरू झालं होतं... तिथल्या मुलांशी अगदी छान गट्टी जमली होती... चिऊचे तर सगळेच फॅन झाले होते... एक दिवस असाच आश्रमातल्या माळीबुवांशी गप्पा मारत बागेजवळ उभा होतो... इतक्यात चिऊ धावत धावत माझ्याजवळ आली... आणि माझा हात धरून ओढत म्हणाली,
"दादा, चल ना लवकर..."
"कुठे ? कशाला ?"
"माझ्या खोलीत... तुला एक गंमत दाखवायची आहे..."
"कसली गंमत...?"
"तु चल तर खरं..."
तिने मला ओढतच तिच्या खोलीकडे नेलं...
"दादा, हळूच ये..."
सावकाश पावलं टाकत, आवाज न करता मी तिच्या खोलीत शिरलो...
"दादा, ते बघ..." तिने तिच्या कपाटाच्या वरच्या बाजूला बोटाने निर्देश करत म्हटलं... मी पाहिलं तर तिथे एका चिमणीने एक छोटसं नाजूक घरटं बांधलं होतं...
"दादा, मी तुला समुद्रावर बोलले होते ना... चिऊताईबद्दल... ते बघ... तिने घरटं बांधलंय... आत्ता ती इथे नाही... पण सकाळी ती इथून जाते आणि संध्याकाळी परत येते... माळीकाका म्हणतात, चिऊताईने घरट्यात अंडं घातलंय म्हणून... हो का रे? खरंच ?"
...मी खिडकीवर चढून त्या घरट्यात डोकावून पाहिलं... तर आत त्या चिमणीने खरंच अंडं घातल्याचं मला दिसलं...
"दादा, काय पाहतोयस...?"
"चिऊ, अगं तुझ्या चिऊताईने इथे खरंच एक अंडं घातलंय..."
"हो...?" चिऊने अगदी कुतुहलाने विचारलं...
"मला पण दाखव ना रे..."
मी चिऊला उचलून घेतलं आणि ते अंडं दाखवलं...
"वा ! किती छान ! म्हणजे आता चिऊताईला बाळ होणार ना रे...?"
"हो..."
"मज्जाच मज्जा...!"
"कसली मजा ?"
"तिला बाळ झालं ना कि मग मी त्याल आंघोळ घालीन... त्याला पाऊ-टीटी लावीन... त्याला खाऊ देईन... आणि त्याला गाई-गाई आली ना, कि मग त्याला गाणं म्हणून झोपवीनसुद्धा...!"
चिऊ अगदी निरागसपणे हे सगळं बोलत होती... तिचं ते बोलणं ऐकून विस्मरणात गेलेली लहानपणीची चिऊ-काऊची गोष्ट आठवली...
त्यानंतर चिऊ रोज त्या घरट्याजवळ पाण्याने भरलेली वाटी ठेवू लागली... वरीचे दाणेही ठेवायची... इथेच सगळी सोय झाल्यामुळे चिमणीसुद्धा फारशी बाहेर जाईनाशी झाली... चिऊची आणि त्या चिमणीची खूप चांगली गट्टी जमली होती...
...तो आश्रम आता मला अगदी माझ्या घरासारखा वाटू लागला होता... सगळ्यांशीच खूप चांगलं नातं निर्माण झालं होतं... इतक्या दिवसांत एक गोष्ट मला इथे प्रकर्षाने जाणवत होती... इथले सर्व लोक चिऊची विशेष काळजी घेत होते... तिला जास्त पाण्यात भिजून द्यायचे नाहीत... बाहेर जाताना शक्यतो तिच्या नाका-तोंडावर मास्क बांधला जायचा... आश्रमातलं एखादं मुल आजारी पडलं, तर चिऊला त्याच्यापासून जाणीवपुर्वक लांब ठेवलं जायचं... शेवटी एक दिवस न राहवून मी ह्याबद्दल काकूंना विचारलं... तेव्हा त्या खूपच उदास झाल्यासारख्या वाटल्या... त्यांच्या चेह-यावरचं नेहमीचं तेज मला काहीसं कमी झाल्यासारखं वाटलं...
"नवज्योत..." काकूंच्या आवाजात कंप जाणवत होता...
"तुझं निरीक्षण बरोबर आहे... आम्ही चिऊची इतरांपेक्षा विशेष काळजी घेतो..."
"पण का...?"
"याला कारण - नियती..."
"नियती...?" काहीही न उमगून मी विचारलं...
"हो... नियती... नवज्योत, चिऊ ही एक शापित परी आहे..."
"म्हणजे...?"
"म्हणजे... ती HIV पॉझिटीव्ह आहे..."
"काय...?" मी जवळजवळ ओरडलोच... माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती... हातांना कंप सुटला होता... छातीत धडधडू लागलं होतं... विचारशक्ती सुन्न झाल्यासारखी वाटत होती... थोड्या वेळाने स्वत:ला सावरलं... काकू खाली मान घालून बसल्या होत्या...
"काकू, काय सांगताय काय...?"
"खरंय ते... चिऊ सापडल्यानंतर १५ दिवसांची गोष्ट... दर महिन्याला आश्रमात मुलांची आरोग्य तपासणी होते... एकदा अशाच तपासणीच्या वेळी चिऊच्या रक्तात AIDS चे विषाणू सापडले... आम्हांलाही फार मोठा धक्का बसला होता... डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चिऊला HIV ची बाधा तिची आई किंवा वडिलांकडून झाली होती... तिची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे... आपण सजरा केलेला तिचा वाढदिवस कदाचित शेवटचाच असेल... बोलता बोलता काकूंचा गळा दाटून आला..."
...अगदी सुन्न होऊन मी हे सगळं ऐकत होतो... नियतीने एका निष्पाप गोड मुलीची क्रूर चेष्टा केली होती... आई-बापाच्या कुकर्मांची शिक्षा त्यांची ही चार वर्षांची निष्पाप मुलगी भोगत होती... काय दोष होता तिचा...? तिला बिचारीला तर ह्या सगळ्याची जाणीवच नव्हती...
...विषण्ण मनस्थितीत मी आश्रमातून घरी आलो... पावलं खूप जड झाली होती... रात्रभर नीट झोपही लागली नाही... सारखा चिऊचा निरागस चेहरा डोळ्यांसमोर यायचा... तिच्या गालावरच्या गोड खळ्या आठवून मन उदास व्हायचं... तिचं वाढदिवसाच्या वेळेचं ते रूप सारखं नजरेसमोर येत होतं... नियतीचा खूप राग येत होता... पण काय करणार ? नियतीपुढे कुणाचंच काही चालत नसतं...
...मित्रांनी माझ्या उदासीचं कारण विचारलं... पण मी उत्तर देणं टाळलं...
...नंतर चार-पाच दिवस आश्रमात गेलोच नाही... जावसंच वाटत नव्हतं... तिथे गेलो कि चिऊ समोर येणार आणि... नकोच ते...
एके दिवशी काकूंचाच मला फोन आला... चिऊ माझी आठवण काढत होती म्हणाल्या... तिने मला बोलावलंय असंही म्हणाल्या... शेवटी न राहवून आश्रमात गेलो... मला पाहून चिऊ धावतच जवळ आली...
"दादा, इतके दिवस कुठे होतास ? मला भेटायला का आला नाहीस ? रागवलास का माझ्यावर ?" तिचे हे निरागस प्रश्न ऐकून मनात कालवाकालव होत होती... तिचे हात हातात घेऊन तिला म्हणालो...
"नाही गं... तुझ्यावर कशाला रागवेन...? अगं ऑफिसमध्ये काम जरा जास्त होतं ना... म्हणून नाही जमलं यायला... बर, तुझी चिऊताई काय म्हणतेय ? बाळ झालं का तिला...?"
"नाही ना अजुन..." थोड्या हिरमुसल्या सुरात चिऊ म्हणाली... "किती वाट बघतेय मी... बाळासाठी घर पण बनवायचं आहे ना..."
"होईल गं... थोडीशी वाट बघावी लागेल इतकंच...!"
"दादा, चिऊताईच्या बाळाचं नाव काय ठेवायचं...?"
"तुच सांग ना..."
"अं... नवज्योत..." ती म्हणाली आणि न राहवून मी तिला कवेत घेतलं... डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या... पटकन रूमालाने पुसून चिऊला म्हटलं...
"चल, मी निघतो..."
"उद्या येशील ना परत...?"
मानेनंच 'हो' म्हणून मी तिथुन निघालो... चिऊचा खुपच लळा लागला होता...
----------------------
...चिऊच्या शरीरातला HIV कधीही AIDS चं रुप धारण करू शकत होता... आणि एकदा का तसं झालं, कि मग... नाही... नकोच तो विचार... डोकं अगदी सुन्न होऊन गेलं होतं... मी खोलीतल्या सर्व मित्रांना हे सांगितलं... सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता... कोणाचाच विश्वास बसत नव्ह्ता... त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नाही... सारखी चिऊच नजरेसमोर येत होती... चिऊची आणि माझी पहिली भेट आठवली... तिचे ते पाणीदार डोळे, नाजूक ओठ, गोड खळ्या आठवून अस्वस्थ होत होतो... वाढदिवसाच्या वेळेचं तिचं ते रूप आठवून डोळ्यांत टचकन पाणी आलं... तिच्या वाढदिवसाला केलेली मजा आठवली... गाडीमध्ये चिऊने म्हटलेले सुस्पष्ट उच्चार असलेले संस्कृत श्लोक कानांमध्ये पुन्हा गुंजन घालतायत असं वाटू लागलं... समुद्रकिना-यावर एकाग्र होऊन घर बांधणारी चिऊ डोळ्यांसमोर आली आणि मी तिच्या घराचं कौतुक केल्यावर तिने केलेलं ते गोड हास्य आठवलं आणि... मला हुंदका अनावर झाला... मोबाईलमधले चिऊचे आणि आमचे फोटो बघत मी रात्रभर रडत होतो... सकाळ कधी झाली कळलंच नाही...
...असेच काही दिवस गेले असतील... आणि शेवटी ज्याची भिती वाटत होती, तेच झालं... एके दिवशी संध्याकाळी काकुंचा फोन आला... त्या खूप घाबरल्यासारख्या वाटत होत्या...
"हॅलो..."
"हॅलो, नवज्योत, काकू बोलतेय..."
"हां, काकू... बोला..."
"अरे, चिऊला दवाखान्यात अँडमिट केलंय..."
"काय...? का...?" मी घाबरून विचारलं..."
"सगळं सांगते... तुम्ही 'जीवन' क्लिनिकमध्ये या लवकर..."
काकुंनी फोन ठेवला... आम्ही सर्व ताबडतोब 'जीवन' क्लिनिकमध्ये पोचलो... आम्हांला पाहून काकू धावतच आमच्याकडे आल्या... आणि अचानक त्यांचा गळा दाटून आला...
"काकू, काय झालं ? कुठाय चिऊ ? कशी आहे ती...?"
"अरे, एवढं जपूनसुद्धा शेवटी चिऊला Infection झालंच... आणि आधीच तिची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तिला इतरही वेगवेगळी Infections लागोपाठ झाली...
...आम्ही समजून चुकलो... HIV ने AIDS चं रूप धारण केलं होतं... एकाच वेळी चिऊला अनेक आजारांनी आपलं लक्ष केलं होतं... आम्ही डॉक्टरांना भेटलो... त्यांच्या म्हणण्यानुसार चिऊ औषधोपचारांनाही चांगला प्रतिसाद देत नव्हतो... आम्ही डॉक्टरांकडे चिऊला भेटण्याची परवानगी मागितली... डॉक्टरांनीही ती दिली... आम्ही सर्व चिऊच्या वॉर्डमध्ये गेलो...
...चिऊकडे अक्षरश: बघवत नव्हतं... तिच्या चेह-यावरचं तेज नाहीसं झालं होतं... तिचे पाणीदार डोळे खोल गेले होते... ओठांवरचं ते मोहक हास्य आणि गोड खळ्याही अदृश्य झाल्या होत्या... चिऊला ओळखताच येत नव्हतं... मी तिच्या पलंगावर तिच्या शेजारी बसलो... तिचा हात हातात घेतला आणि चिऊ अस्फुटशी हसली... तिचं ते केविलवाणं हसणं बघून मनाला खूप वेदना झाल्या... कुठे ते समुद्रावरचं हसणं आणि कुठे हे...
...नियती खरंच खूप दुष्ट आहे...
...चिऊ थकलेल्या बारीक आवाजात मला म्हणाली,
"दादा, मला इथे कंटाळा आलाय... मला माझ्या खोलीवर जायचंय... मी दोन दिवस चिऊताईला दाणा-पाणी ठेवलं नाही... उपाशी असेल ना ती... रागवेल माझ्यावर... तिला बाळ झालं ना, कि ते बोलणार नाही माझ्याबरोबर... मी त्याच्यासाठी कापसाचं घर बांधलं नाही ना... कट्टी घेईल ते माझ्याशी... चल ना मला घेऊन तिकडे..." मला काय बोलावं ते सुचेना... स्वत: अशा परिस्थितीत असतांना, त्या मुक्या प्राण्यांची काळजी करणारी चिऊ मला त्या क्षणी खूपच महान वाटली...
...आम्ही पुन्हा डॉक्टरांना भेटलो... चिऊला घरी नेण्याबद्दल त्यांना विचारलं... संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन दिलं... डॉक्टरांनीही जास्त आढेवेढे न घेता परवानगी दिली... सोबत चिऊच्या देखभालीसाठी एक नर्सही दिली... आम्ही चिऊला घेऊन तिच्या खोलीवर आलो...
...तिथे गेल्यावर मात्र चिऊचा चेहरा थोडासा खुलल्यासारखा वाटला... तिने सगळ्यांत आधी चिमणीला दाणा-पाणी ठेवलं... आणि मग पलंगावर येऊन झोपली..
...चिऊसोबत आलेली नर्स तिची नेहमी व्यवस्थित काळजी घेत असे... आम्हीही ऑफिसतून आल्यावर चिऊला भेटायला जायचो... सोबत तिच्या आवडीची चॉकलेट्सही न्यायचो... पाच-सहा दिवस गेले... पण चिऊमध्ये विशेष फरक जाणवत नव्हता... एक सुंदर नाजूक फुल दिवसेंदिवस कोमेजत चाललं होतं...
...एके दिवशी संध्याकाळी आम्ही चिऊला भेटायला गेलो... चिऊ पलंगावरच पडून होती... बाजूला नर्स आणि काकू उभ्या होत्या... काही मुलंही भिंतीबरोबर उभी होती... खोलीतलं वातावरण खूपच अस्वस्थ वाटत होतं... चिऊ आज खूपच कृश वाटत होती... मी काकूंकडे पाहिलं... काकुंनी फक्त नकारार्थी मान हलवली आणि डोळ्यांना पदर लावून त्या खोलीबाहेर गेल्या... आम्ही चिऊजवळ गेलो... आम्हांला पाहून चिऊ किंचीत हसली... तिचं ते हसणं माझं काळीज चिरत गेलं...
...ती हलकेच म्हणाली,
"दादा, चिऊताईचं बाळ रागावलं माझ्यावर... बघ ना, अजुनही ते अंड्यातुन बाहेर येत नाही... मला त्याला बघायचंय रे... त्याच्यासाठी छानसं मऊ मऊ कापसाचं घर बांधायचंय... चिऊताईच्या बाळाला थंडी लागेल ना म्हणून... पण मला आता काहीच जमत नाहीये... तु बांधशील का रे घर त्याच्यासाठी ? चिऊताईला म्हणावं माझ्यावर रागावू नकोस..."
...इतकं बोलून चिऊला एक जोरदार खोकल्याची उबळ आली... नर्स तिच्याकडे धावली... चिऊने माझा हात हातात धरला होता... मला तर काहीच सुचत नव्हतं... मीही तिच्या हातावर माझा तळवा ठेवला... ती पुन्हा अस्फुटशी हसली आणि...
...आणि... माझ्या हातावरची तिची पकड सैल झाली... हात गार पडले... मघापासून वर-खाली होणारी तिची छाती आता शांत झाली... त्या गोड सोनपरीने ह्या जगाचा निरोप घेतला होता... ओठांवर तेच अस्फुटसं हास्य ठेवून चिऊने डोळे मिटले होते... कायमचे... उमलण्याआधीच कोमेजलेलं फुल अखेर गळून पडलं होतं... आश्रमरूपी घरट्यातून एक गोड चिमणी अवेळीच उडून गेली... मनाला हुरहूर लावून... आज आश्रमातला आनंद पोरका झाला होता... आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली ती कोण कुठली पोर... पण आयुष्यात कधीही न भरणारी पोकळी निर्माण करून ती निघून गेली... कायमची... मी हातात तोंड लपवून रडत होतो... कुणालाच अश्रू आवरत नव्हते...
इतक्यात...
...इतक्यात, कपाटावरच्या त्या चिमणीच्या घरट्यातून नाजूक चिवचिवाट ऐकू आला... मी धावत जाऊन वर पाहिलं... चिमणीचं पिल्लू अंड्यातून बाहेर येत होतं... चिमणीचं पिल्लू ? नाही... चिऊच ती... आमची चिऊच ती... पुन्हा आली होती... त्या पिल्लाच्या रूपाने... त्या पिल्लाने डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहिलं... ओळख पटली... आणि त्याने पुन्हा नाजूक चिवचिवाट केला... माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं... आता ह्या चिमुकल्या चिऊसाठी मी घर बांधणार होतो... कापसाचं... मऊ मऊ... माझ्या चिऊला थंडी नको लागायला...!!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
navjyotvelhal2009@gmail.com ९४२१४३८००७, ८०९७१६८३२०
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~